| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील ठेकेदारांचे विविध शीर्षका अंतर्गत 204 कोटी रुपयांची बिले मागील तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदारांची आर्थिक स्थिती खालवली आहे. कामासाठी घेतलेल्या कर्जावर बँकेचे वाढणारे व्याज आणि उधारी मिळावी, यासाठी सप्लायर्सनी लावलेला तगादा यामुळे ठेकेदार घायकुतीला आले आहेत. दर वर्षी मार्च अखेर रखडलेली बिले मिळतातच. त्यासाठी अधिकारी वर्गाने शासनाकडे पाठपुरावा करून भरीव निधी आणावा, या करिता कर्जत तालुका ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांनी मागील आठवड्यात आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी, दोन दिवसांत भरीव निधी आणेन असे आश्वासन देऊन उपोषण सोडण्यास भाग पाडले होते. परंतु, या वर्षी कुठल्याही शीर्षकाला एक रुपयाचा सुद्धा निधी प्राप्त होणार नाही याची खात्री पाटल्याने संघटनेचे अध्यक्ष राहुल डाळिंबकर यांच्यासह सर्व ठेकेदारांनी चव्हाण यांच्या कार्यालयात बसून ठिय्या आंदोलन केले.
कर्जतमधील ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन
