चार जणांचा मृत्यू; दोघे गंभीर
। गडचिरोली । प्रतिनिधी ।
गडचिरोली-आरमोरी मार्गांवरील काटली गावाजवळ एका अज्ञात ट्रकने मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा मुलांना चिरडले. ही घटना गुरुवारी (दि. 07) पहाटे घडली असून या अपघातात चार मुलांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपुरला उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे काटली गावावर शोककळा पसरली असून, संतप्त गावकऱ्यांनी रास्ता रोको सुरू केला आहे. टिंकू नामदेव भोयर (14), तन्मय बालाजी मानकर (16), दुषण दुर्योधन मेश्राम (14), तुषार राजेंद्र मारभते (14) सर्व राहणार काटली अशी मृतांची नावे आहेत.
गडचिरोली शहरापासून सात किलोमीटर अंतरावरील काटली गावातील सहा तरुण मुले नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक आणि व्यायाम करण्यासाठी गेले होते. काटलीच्या नाल्याजवळ हे तरुण रस्त्याच्या कडेला बसले असताना भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. इतर चार तरुणांना तातडीने गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यापैकी आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नागपूर येथे उपचारांसाठी हलवण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संतप्त गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. गडचिरोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, धडक दिल्यानंतर अंधाराचा फायदा घेत ट्रक चालक पसार झाला. याप्रकरणी पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून पोलीस वाहन व चालकाचा शोध घेत आहेत.
