। गुजरात । वृत्तसंस्था ।
गुजरातमध्ये वडोदरा–जरोद रोडवर कोटांबी स्टेडियमजवळ बुधवारी (दि.17) सकाळी एक भीषण अपघात घडला. एका स्लीपर बसने पुढे उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, बालाजी ट्रॅव्हल्सची लक्झरी बस राजस्थानमधील बांसवाडा येथून सूरतकडे जात होती. चालकाला प्रवासादरम्यान झोप लागल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की, बसचा पुढचा भाग पूर्णपणे ट्रकमध्ये अडकून बसला. अनेक प्रवासी बसमध्ये अडकले. अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि वडोदरा अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. या अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 31 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातामुळे वडोदरा–जरोद हायवेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
