। पनवेल । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातात सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आदई गावाजवळ महिला आपल्या बाळासह रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात केली आहे. संकेत बळवंत चव्हाण रा. अंधेरी हे कारने पुणे-मुंबई मार्गिकेवरून मुंबईकडे जात होते. नवीन पनवेलजवळील आदई गावाजवळ सुवर्णा काळे (24) रा. आदई गाव या आपल्या सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन द्रुतगती महामार्ग ओलांडत होत्या. या ठिकाणी पादचाऱ्यांना प्रवेशास मनाई असतानाही त्या रस्ता पार करण्याचा प्रयत्न करीत असताना भरधाव कारची धडक बसली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. तत्काळ दोघांनाही कामोठे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. सुवर्णा यांच्यावर उपचार सुरू आहेत.






