सहा जणांची लाखोंची फसवणूक

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

ओमकारा प्राईड या इमारतीमध्ये फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या सहा ग्राहकांकडून 17 लाख 3 हजार रुपये घेऊन ती रक्कम कंपनीकडे जमा न करता रकमेचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनायक प्रभाकर लोखंडे (रा. कानसई, सेक्शन, अंबरनाथ पूर्व) याच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाषु सुभाष बिस्वाल हे खारघर, सेक्टर 27 येथे राहत असून त्यांचे रियल इस्टेट क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. ते विविध बिल्डर्सने बांधलेले इमारतीतील फ्लॅट ग्राहकांना विकणे, मार्केटिंग करणे व जाहिरात करण्याची कामे करतात. घोटगाव येथे ओंकारा प्राईड ही बिल्डिंग निर्मणाधीन असून त्या बिल्डिंगमधील फ्लॅट विक्री करण्याचे कंत्राट त्यांच्या कंपनीला मिळाले. त्यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार साईट हेड म्हणून विनायक प्रभाकर लोखंडे हा काम करत होता. लोखंडे याने फ्लॅट खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या सहा ग्राहकांकडून एकूण 17 लाख 3 हजार रुपये घेतले. मात्र ते पैसे कंपनीला किंवा बिस्वाल यांना कळवले नाही आणि ग्राहकांकडून घेतलेल्या पैशांचा अपहार स्वतःच्या फायद्यासाठी केला. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात विनायक प्रभाकर लोखंडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version