| पनवेल | वार्ताहर |
तब्बल 99 लाखांच्या फ्लॅट फसवणुकीच्या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश सेंघानी, मणिलाल सेंघानी, बिरेंद्र यादव आणि मधुकर मयेकर अशी गुन्हा दाखल झालेल्या चार जणांची नावे असून, पनवेल फौजदारी न्यायालयाच्या आदेशानुसार चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलिसांकडून करण्यात आली असल्याचे समजते. यातील तक्रारदार हबिंदर सिंग सहगल यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी भावेश सेंघानी, मणिलाल सेंघानी, बिरेंद्र यादव आणि मधुकर मयेकर यांनी एकमेकांशी संगनमत करून त्यांची फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. यातील मधुकर मयेकर यांनी खारघर सेक्टर 10, प्लॉट नंबर 204, एशियन गॅलेक्सी येथील फ्लॅट क्रमांक ए-704 चे कुलूप तोडून जबरदस्तीने ताबा घेतला व यानंतर मयेकर याने फ्लॅट रिकामा करण्यास नकार दिल्यावर, बिल्डरने तक्रारदाराला त्याच प्रकल्पात आणखी दोन फ्लॅट (3-60 आणि 3-602) देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनाचा वापर करून, आरोपीने तक्रारदाराकडून फ्लॅटसाठी एकूण 99 लाख 12 हजार 030 रूपये इतकी रक्कम वसूल केली. मात्र ती रक्कम मिळाल्यानंतरही, त्यांना आजतागायत दोन्ही फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे हरबिंदर सिंग सेंहगल यांनी न्यायालयात धाव घेवून न्यायालयाचे दरवाजे ठोठावले असता, अखेरीस न्यायालयाच्या आदेशानंतर खारघर पोलिसांनी उपरोक्त चार जणांविरोधात फसवणूक आणि बेकायदेशीर मालमत्तेचा ताबा घेतल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.







