चार जण गंभीर जखमी
। रायगड । प्रतिनिधी ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचा रस्ता पावसामुळे निसरडा झाला असून मंगळवारी (दि. 15) सहा वाहने घसरून एकमेकांना धडकली. या विचित्र अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरून सौरभ नितीन शिंदे हे छोटा हत्ती टेम्पो क्रमांक ( MH 12 BF 7228 ) घेऊन मुंबईहून पुण्याकडे जात होते. दरम्यान रसायणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भातान बोगद्यात आले असता त्याचा टेम्पो घसरला आणि लेनवर जाऊन पलटी झाला. त्याचवेळी त्याच्या बाजूने भरधाव वेगात येणाऱ्या आयसर टेम्पो क्रमांक (MH 46 BM 3273) याने त्याच्या पुढील अज्ञात वाहनास जोरदार धडक दिली. तर त्याच्या पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक (MH 01 EW 3201) ही चालक सुनील चक्रवती याने ब्रेक लावला. त्यामुळे बस पावसाच्या पाण्यामुळे घसरून बोगद्याच्या तिसऱ्या लेनच्या भिंतीला जोरदार धडक देऊन आडवी झाली. तर या बसच्या पाठीमागून येणारी टेम्पो ट्रॅव्हल्स बस क्रमांक (DD 01 X 9730) ही सुद्धा घसरल्याने तिने समोरील अज्ञात कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात परशुराम दत्तात्रय हेगडे (वय 49, रा. कोल्हापूर), लियाकत नालबंद (75), दिपक गिरीधर गावकर (42), अनिल ढाकणे क्रेन मदतनीस हे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जाऊन मार्ग निसरडा होऊन अनेक अपघात झाले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी आयआरबी यंत्रेनेने उपाययोजना करण्याची गरज आहे.







