। अलिबाग । प्रतिनिधी ।
खारेपाट विभागात आंबेपूर ग्रामपंचायत हद्दीत खेळाडूंसाठी बाल युवक क्रीडा मंडळ आंबेपूर येथे ऑलिंम्पिक साईजचे 50-50 फुटांचे दोन अद्यावत तसेच सर्व सुखसोयीयुक्त बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच चित्रलेखा पाटील यांनी केली. त्यामुळे खारेपाटातील खेळाडूंचा ऑलिंम्पिकमध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
लवकरच बांधकामाचा शुभारंभ शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष, प्रतोद अॅड. आस्वाद पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य भावना पाटील, चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील इतर ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यापुढे माहिती देताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, खारेपाटात राष्ट्रीय दर्जाने अनेक खेळाडू आहेत. मात्र त्यांना सरावासाठी अद्ययावत मैदान उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मागणीचा विचार करुन खारेपाटात ऑलिंम्पिकच्या दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी नागाव येथील पीएनपी संकुलात बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. त्यावेळी मैदानाचे नियम, साहित्य याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे खारेपाटात बॅडमिंटन कोर्ट उभारताना त्याचा निश्चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.
खेळाडूंसाठी महाद्वार खुले करणार
आपल्याकडे पी. व्ही. सिंधु, सायना नेहवाल, अश्विनी पोनप्पा, ज्वाला गुड्डा अशा देशाचे नाव उज्वल करणार्या कर्तुत्ववान बॅडमिंटन खेळाडू का तयार होऊ शकत नाहीत? याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्या जिल्ह्यातही असे खेळाडू घडले पाहिजेत. खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास भविष्यात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. त्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. पुढील दोन ते तीन महिन्यांत खारेपाटाला बंदिस्त, अद्यावत, आसन व्यवस्था असणारे बारमाही, सर्वांना खेळता येईल असे बॅडमिंटन कोर्ट मिळणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.