शेकाप नेते पंडित पाटील यांचा दणका

अलिबाग वडखळ रस्ता आणि जेएसडबल्यू कंपनीच्या समस्यांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी अलिबाग वडखळ रस्त्याच्या चौपदरीकरण तसेच जेएसडब्ल्यू कंपनीच्या समस्यांवर आवाज उठवल्यानंतर या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक 2 जुन रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यसंदर्भात प्रभारी जिल्हा अप्पर दंडाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील यांच्या सहीचे पत्र पंडित पाटील यांना देण्यात आले आहे. पंडित पाटील यांनी 5 मे तसेच 30 मे रोजी प्रशासनाला निवेदन देत विविध मागण्यांकडे लक्ष वेधले होते.
पंडित पाटील यांनी आक्रमक होऊन पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असलेल्या अलिबाग ते वडखळ रस्त्यांचे चौपदरीकरण करा, अशी मागणी अलिबागच्या तहसीलदार मीनल दळवी यांच्याकडे केली होती.
या अरुंद रस्त्याच्या बाजूला बेकायदा भराव टाकला जात असल्याने पावसाळ्यात गटारे तुंबली जाणार आहेत. त्यातच जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाचा त्रासही होत असतो. याकडे सर्व गोष्टींकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या दोन्ही विभागांतील अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्याच काम केले जात आहे.
अलिबाग-वडखळ रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाचा की सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात यावा; अन्यथा येत्या ६ जूनला रास्ता रोका केला जाईल, असा इशारा माजी आमदार पंडित पाटील यांनी तहसीलदार मीनल दळवी यांना दिला होता. संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन यावेळी तहसीलदार दळवी यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेत या संदर्भात बैठकीचे आयोजन केले आहे.

Exit mobile version