विनीत छायनाखवा प्रथम, भावार्थ सारंग द्वितीय
| अलिबाग | संतोष राऊळ |
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधत रायवाडी-आक्षी येथे शेकापच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नारळफोडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विनीत छायनाखवा यांनी प्रथम तर भावार्थ सारंग यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने प्रथमच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी गम्मत म्हणून नारळावर नारळ आपटून ज्याचा नारळ शेवटपर्यंत टिकेल तो जिंकला असा खेळ व्हायचा. आता त्या खेळाचे रूपांतर मोठ्या स्पर्धेत होऊ लागले आहे. या स्पर्धेसाठी मोठ मोठी पारितोषिके सुद्धा ठेवली जातात. नारळ कोणताही असो पण नारळ फोडी खेळण्यासाठी नारळ विशेष पद्धतीने धरणे तसेच टेक्निकचा वापर करून समोरच्याच्या नारळावर आघात करणे हेही तेवढेच महत्वाचे. अशा नारळ फोडीच्या स्पर्धेचे आयोजन विशेष करून अलिबाग तालुक्यातील आक्षी-नागांव-चौल या विभागात मोठ्या प्रमाणात केले जाते. या स्पर्धांना नारळी पौर्णिमेच्या महिनाभर अगोदरच सुरवात होते. त्यामुळे नारळ विक्रेत्यांचा व्यवसायही यावेळी मोठया प्रमाणात होतो. आता शेतकरी कामगार पक्षाने सुद्धा नारळ फोडीच्या खेळामध्ये आपले प्राधान्य दिले आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक विनीत छायनाखवा, द्वितीय क्रमांक भावार्थ सारंग, तृतीय क्रमांक वेदांत बानकर, तर चतुर्थ क्रमांकाचे सुरज कवळे हे मानकरी ठरले. ही स्पर्धा रविवारी (दि.27) रायवाडी येथील साखरचौथ गणपती शेड जवळ शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या स्पर्धेचा शुभारंभ जेष्ठ नेते द्वारकानाथ नाईक व माजी सरपंच नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्या रश्मी वाळंज, नीरजा नाईक, शेकाप कार्यकर्ते विलास राणे, रश्मीन गुरव, सुनील नाईक, अनिल म्हात्रे, मनोज खेडेकर, युवा नेते अभिजित वाळंज, संतोष राऊळ, सुमित कवळे, विशाल राणे, कुमार बानकर, शेषनाथ बानकर, राजेंद्र बानकर तसेच नागांव ग्रामपंचायत सदस्या हर्षदा मयेकर आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत एकूण 128 जणांनी आपला सहभाग नोंदवला. मंडळाकडून देण्यात आलेल्या पाच नारळांपैकी ज्या दोघांचे नारळ शिल्लक राहतील तो अंतिम सामना खेळणार होता. आणि अंतिम फेरीत विनीत छायनाखवा याची भावार्थ सारंग या लहानग्याशी लढत झाली. या अटीतटीच्या सामन्याच्या शेवटी दोघांकडेही मंडळाने दिलेल्या पाच नारळांपैकी प्रत्येकी एक-एक नारळ शिल्लक राहिले होते. एका जोरदार फटक्यात दोघांचेही नारळ एकाचवेळी फुटल्यामुळे दोघांनाही पुन्हा प्रत्येकी एक-एक नारळ देण्यात आले. पुन्हा सामना रंगला आणि अंतिम विजेता ठरला तो विनीत छायनाखवा. यावेळी द्वितीय स्थानावर समाधान मानावं लागणाऱ्या भावार्थ सारंग या लहानग्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे या स्पर्धेची सुरवात आणि शेवटही भावार्थने केला. चित्रलेखा पाटील यांनी भावार्थ सारंग याचे भरभरून कौतुक केले. यावेळी स्पर्धेचे समालोचन संजय पोईलकर यांनी केले.
स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते रूपये 6666/- रोख व चषक, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस विलास राणे यांच्या हस्ते रूपये 4444/- रोख व चषक, तृतीय क्रमांकाचे बक्षीस रश्मी वाळंज यांच्या हस्ते रूपये 2222/- रोख व चषक आणि चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस अभिजित वाळंज यांच्या हस्ते रुपये 2222/- रोख व चषक प्रदान करण्यात आले.