आदिवासी समाजाच्या समस्या सोडविण्यास कटिबद्ध- आ. जयंत पाटील

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

आदिवासी समाजावर माझे प्रेम आहे. त्यामुळे आदिवासी समाजाच्या प्रत्येक समस्या सोडवण्याचा कायमच प्रामाणिक प्रयत्न करत राहू. त्यांना आधुनिक पद्धतीने जीवन जगता यावे, आधुनिक पद्धतीचा वापर करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिली. शेतकरी भवन येथे बुधवारी (दि.25) बारशेत येथील ग्रामस्थांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अलिबाग तालुक्यातील बारशेत ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आ. जयंत पाटील यांनी तातडीने सोडवल्याने त्यांना धन्यवाद देण्यासाठी त्यांनी शेतकरी भवन येथे आ जयंत पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोरघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मधुकर ढेबे, पेझारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अ‍ॅड. मनोज धुमाळ, शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, मोहन धुमाळ, धर्मा लोभी, बारशेत येथील शेकापचे कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारशेत गावात काही दिवसांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे आ. जयंत पाटील यांच्याकडे ग्रामस्थांनी गावाला नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी केली. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी ग्रामस्थांची मागणी मंजुर करून तातडीने कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता बिराजदार यांनी कामाला सुरुवात केली आहे. यामुळे गावातील पाण्याची समस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version