। अलिबाग । प्रतिनिधी ।
गेल्या अनेक दिवसांपासून प्रकल्पग्रस्त शेतकरी न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. बीजेपी, शिंदे गट शिवसेनेचे सरकार असूनदेखील येथील शिंदे गटाचे व भाजपच्या आमदारांनी अधिवेशनात प्रश्न का नाही, मांडला. प्रकल्प येत असताना जगाच्या पोशिंद्याकडे दुर्लक्ष होत असेल, तर शेतकरी कामगार पक्ष कधीही सहन करणार नाही. भुमीपुत्रांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष ठामपणे उभा राहिल. त्यांच्यासाठी रस्त्यावरदेखील उतरेल असे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
मुरुड तालुक्यातील निडी, वाघुलवाडी, चेहेर, मिठेखार, साळाव आदी गावांतील शेतकर्यांचे अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. ही बाब शेतकरी कामगार महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी बुधवारी दुपारी उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
यावेळी उपोषणकर्त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपुर्ण शेकाप पक्षाची संघटना तुमच्या सोबत राहणार असे आश्वासन देत चित्रलेखा पाटील म्हणाल्या, शेतकरी कामगार पक्षाने कधीही प्रकल्प, विकासाला विरोध केला नाही. मात्र जे प्रकल्प येतात. त्या प्रकल्पांबरोबरच, विकासामुळे जगाचा पोशिंदा, शेतकरी वर्ग दुर्लक्षीत राहत असल्याचे चित्र कायमच आहे. स्थानिकांना प्राधान्य दिले पाहिजे हा कायम अट्टहास असतो. लोकप्रतिनिधीच दलाल झाले, तर लोकांची काळजी काय करणार, लोकप्रतिनिधी हे आजचे कार्पोरेट खोत आहेत. प्रकल्प उभारून भांडवदाराच्या खिशात पैसे जात असतील तर असे प्रकल्प , विकास कशाला हवेत. अशी संतापजनक प्रतिक्रीया व्यक्त करीच चित्रलेखा पाटील म्हणाल्या,
महिनाभर मुरुड तालुक्यातील शेतकरी, महिला वर्ग त्यांच्या न्याय हक्कासाठी उपोषण करण्यासाठी बसले आहेत. हा प्रश्न मार्गी लावण्याचे अमिष देत शिंदे गटाच्या आमदाराने सहानभूती दाखविली. भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी तसेच जिल्ह्यातील नेत्यांनी देखील आश्वासन दिले. मात्र भूमीपुत्र वंचित राहिले.याबाबत शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी अधिवेशनात आवाज उठवला. प्रकल्प न उभारलेल्या जमीनी परत करा अशी मागणी अधिवेशनात केली. पण ज्यांची सत्ता आहे, त्या आमदारांनी मात्र याकडे दुर्लक्ष केले, ही मोठी शोकांतिका आहे.
शेतकरी कामगार पक्ष कोणत्याही अपेक्षेसाठी काम करणारा पक्ष नसून कष्टकरी, शेतकर्यांशी बांधिलकी जपणारा पक्ष आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी हक्कासाठी बसले आहेत.त्या शेतकर्यांसोबत शेतकरी कामगार पक्ष कायमच राहणार आहे. कंपनीच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यासाठी देखील आम्ही शेतकर्यांसोबत आहोत. न्याय मिळवून देण्यासाठी सोबत आहोत. मात्र आत्मदहनासारखी टोकाची भुमिका न घेता चळवळीच्या माध्यमातून लढा द्या. वेळ पडली, तर लाखो कार्यकर्ते रस्त्यावर शेतकर्यांच्या हक्कासाठी येऊ, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना यावेळी देण्यात आले.