सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या पाठीशी शेकाप कायम राहिल- चित्रलेखा पाटील

| अलिबाग | प्रतिनिधी |

शिक्षक हा समाजाला दिशा देणारा घटक आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिक्षकांचे प्रश्न रास्त आहेत. मात्र त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास सरकारकडे वेळ नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष कायम राहील अशी ग्वाही शेकापच्या महिला आघाडी प्रमुख तथा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी दिली.


रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचा द्वीतीय वार्षिक स्नेह मेळावा रविवारी (दि.03) रोजी अलिबागमधील वेश्वी येथील पीएनपी शैक्षणिक संकुलाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी चित्रलेखा पाटील बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटना महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष अरुण थोरात, कार्यवाह अदिनाथ थोरात, शिवाजीराव किलकिले, रायगड जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, बळवंत वालेकर, अशोक देशमुख, अविनाश म्हात्रे, बी.पी. म्हात्रे, एस.एम. पाटील, उध्दव जोशी आदी मान्यवरांसह रायगड जिल्ह्यातील सेवानिवृत्त मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


याप्रसंगी मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील म्हणाल्या, नारायण नागू पाटील यांच्या पत्नी धेरंड खाडीतून जाऊन मुलांना शिकविण्याचे काम करीत हेोते. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा पायाच शिक्षक आहे. राज्यात, जिल्ह्यात सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे प्रश्न अनेक आहेत. सरकारला पुतळे बांधण्यासाठी व 50 खोके देऊन आमदार घेण्यासाठी वेळ आहे. मात्र सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचे पीएफ, पेंशन देण्यास वेळ नाही. सर्वांनी एक नागरिक व मतदार म्हणून अभ्यास करण्याची गरज आहे. हा बदल होणे काळाची गरज आहे. सर्वांनी संघटीत होऊन संघर्ष करून आपल्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. पेन्शन वेळेवर मिळाली पाहिजे. भविष्यात पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी आहोत.तुमच्या आंदोलनात, मोर्चात आम्ही सहभागी होऊन तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करू असे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी करताना सांगितले, शिक्षक, मुख्याध्यापक म्हणून काम करताना प्रशासन योग्य पध्दतीने वागणूक देत नाही, याचा अनुभव अनेकवेळा आला आहे. सेवानिवृत्त झाल्यावर पेन्शन व अन्य योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पैसे दिल्याशिवाय कामच करत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे संघटनेची गरज आहे. हे लक्षात ठेवून सेवानिवृत्त संघटनेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे नेते आ. जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांनीदेखील अनेकवेळा सेवानिवृत्त शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version