। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
कोपरखैरणे परिसरात गुरुवारी (दि.5) सेक्टर-2 मधील विद्या भवन या चारमजली इमारतीचा स्लॅब तळमजल्यावरील खासगी शिकवणी वर्गावर कोसळून 13 जण ढिगाऱ्याखाली अडकले. त्यात एका 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर पाच विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना प्रथमोपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
विद्या भवन सोसायटी या 28 वर्षे जुन्या इमारतीत सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या खासगी शिकवणी वर्गात शिक्षिका शामली चौधरी (53) मुलांना शिकवत असताना स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत मनीष म्हसे (14) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वाशी येथील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या दुर्घटनेमुळे नवी मुंबईत हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. ही इमारत 28 वर्षे जुनी असून तिची अवस्था धोकादायक होती. या इमारतीमध्ये 16 कुटुंबे राहत होती. दरम्यान, या दुर्घटनेमुळे जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, प्रशासनाकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेले 12 विद्यार्थी आणि शिक्षिका अशा एकूण 13 जणांना जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून बाहेर काढले. बचाव केलेल्यांमध्ये सिद्धांत गुप्ता (8), प्रिन्स सोनी (11), आयशा, कुसुम (15), निष्का धनवाडे (14), आराध्या बोडसे (14), तन्वी श्रीवास्तव (7), देवांश पुजारी (12), राजदीप वानखडे (10), पार्थ खैरनार (14), रुद्र येलूरकर (5) आणि शिक्षिका चौधरी (53) यांचा समावेश आहे.
