जाहिरात फलकांसाठी झाडांची कत्तल

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महापालिका क्षेत्रातील अधिकृत 56 जाहिरात फलकांपैकी जास्तीत जास्त फलक हे सायन-पनवेल महामार्गालगत आहेत. रस्त्याच्या कडेला असलेले हे फलक दिसण्यासाठी झाडांची वारंवार कत्तल केली जाते. याबाबत पनवेल महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, तरी देखील हे प्रकार थांबले नसल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रातील जाहिरातींचे सर्वात जास्त फलक सायन-पनवेल महामार्गावर आहेत. हा मार्ग रहदारीमुळे कायमस्वरूपी गजबजलेला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर येथे जाहिराती करण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गालगत असलेले वड, पिंपळ यासारखे विविध महाकाय वृक्षांचा जाहिरात फलकांना अडथळा येत असल्याने रात्रीच्या अंधारात अर्ध्यातून छाटली जात आहे. विशेष म्हणजे, या मार्गाच्या रुंदीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर येथे वटवृक्ष तसेच पिंपळाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. परंतु, जाहिरात फलकांमुळे या झाडांचे भवितव्य अंधारात असून जाहिराती दिसण्यासाठी या झाडांची वाढच होवू दिली जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यापलीकडे कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Exit mobile version