| नेरळ | वार्ताहर |
मध्य रेल्वेचे नेरळ रेल्वे स्थानकात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यासाठी नेरळ स्थानकातील जुनी झाडे तोडण्यात येत आहेत. विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू असल्याने प्रवासी नाराज आहेत. स्थानकात फलाट रुंदीकरण आणि लांबी वाढवणे तसेच स्काय वॉक, निवारा शेड आदी कामे सुरू आहेत. त्यासाठी जागा वाढवत असताना स्थानकात असलेली जुनी झाडे तोडण्याची कामे केली जात आहेत.
सध्या नेरळ फलाट क्रमांक एक वर 25 मीटर लांबीचे निवारा शेड शिल्लक असून अन्य सर्व भागात प्रवाशांना उन्हात बसावे लागत आहे. त्यामुळे प्रवासी वर्गात संताप असताना मध्य रेल्वेकडून नेरळ स्थानकात असलेली जुनी झाडे देखील तोडली जात आहेत. त्यामुळे नेरळ स्थानकातील फलाट एक वर पूर्णपणे उन्हात प्रवासी थांबून असतात. दुसरीकडे सर्वत्र कामे सुरू असल्याने स्थानकात नव्याने आलेले प्रवासी हे गोधळून जात आहेत. मात्र, स्थानकातील जुनी झाडे इलेक्ट्रिक कटर लावून कापली जात आहेत. त्यामुळे झाडाची फांदी तोडताना उपनगरीय लोकलने येणाऱ्या प्रवाशांच्या डोक्यावर कोसळून अपघात होऊ शकतो. विकासाच्या नावाखाली जुनी झाडे तोडण्याची सुरू असलेली मोहीम पाहता स्थानकात एकही जुने झाडे राहणार नाही. त्यामुळे झाडांची सावली शोधणाऱ्या प्रवाशांना उन्हाच्या झळा बसत आहेत याबाबत कोणालाही सोयरसुतक दिसत नाहीत असे देखील प्रवासीवर्गांकडून बोलले जात आहे.







