। मुरुड-जंजिरा । प्रतिनिधी ।
मुरुडमधील तटरक्षक दलातर्फे तटरक्षक दिनाचे औचित्य साधून मुरुड नगरपरिषद शाळेतील मुलांना अचूक नावाच्या जलद गतीने चालणार्या जहाजाचे दर्शन घडवण्यात आले. मुलांना प्रथमच मोठे अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज असलेले जहाज पहावयास मिळाल्याने सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित झाला होता.
मुरुड नगरपरिषदेच्या 60 विद्यार्थ्यांना हि संधी प्राप्त करून देण्यात आली. तटरक्षक दलाने यासाठी विशेष बोटीची सुविधा उपलब्ध करून तटरक्षक दलाची ‘अचूक’ हि अत्याधुनिक यंत्रणेने सजलेली व सर्वात जलद गतीने पोचणारे जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. डेप्युटी कमांडर ऑफिसर कॅप्टन अमोलकुमार मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली याचे विशेष आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांना या जहाजावरील असणार्या शस्त्रसाठा, त्याचप्रमाणे जहाजातील महत्वाच्या भागाची माहिती करून देण्यात आली. जहाजावर असणारी अत्याधुनिक यंत्रणा यावरही शालेय विद्यार्थी यांना माहिती देण्यात आली. बोटीचा वेग व देश विरोधी कृत्य करणार्या व्यक्तीच्या बोटीचा पाठलाग कसा केला जातो, याबाबत सविस्तर माहिती देऊन शालेय विद्यार्थ्यांना तटरक्षक दलाचे कार्य समजावून सांगण्यात आले. यावेळी मुख्याध्यपक राजेश भोईर, अविनाश ठाकूर, महेंद्र हावरे, दिनेश भोईर, शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.