| फ्रँकफर्ट | वृत्तसंस्था |
18 युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत स्लोव्हाकियाने ई गटात सनसनाटी सुरुवात केली. बलाढ्य बेल्जियमला त्यांनी 1-0 फरकाने हरविले. फिफाच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील बेल्जियमसाठी पराभव धक्कादायक आहे, कारण तुलनेत स्लोव्हाकिया 48व्या क्रमांकावर आहे. त्यांच्यासाठी सातव्या मिनिटास इव्हान श्रॅन्झ याने नोंदविलेला गोल महत्त्वपूर्ण ठरला. बेल्जियमवर नशीब रुसले. त्यांच्या रोमेलू लुकाकू याने उत्तरार्धात केलेले गोल दोन वेळा व्हिडीओ असिस्टंट रेफरी (व्हीएआर) द्वारा अवैध ठरले. शिवाय तासाभराच्या खेळानंतर बदली खेळाडू योहान बाकायोको याला फटका स्लोव्हाकियाच्या डेव्हिड हान्को याने गोलरेषेवरून परतावून लावल्यामुळे बेल्जियमची संधी हुकली.
स्लोव्हाकियाविरुद्धच्या पराभवाने बेल्जियमची 15 सामन्यानंतर (10 विजय, 5 बरोबरी) अपराजित मालिका खंडित झाली. तिसऱ्यांदा युरो करंडकात खेळणाऱ्या फ्रान्सेस्को काल्झोना यांच्या मार्गदर्शनाखालील स्लोव्हाकियाची सुरुवात शानदार ठरली. ई गटात स्लोव्हाकिया पुढील लढतीत युक्रेनविरुद्ध 21 जून रोजी खेळेल, तर बेल्जियमचा सामना 23 जून रोजी रुमानियाविरुद्ध होईल. या गटात आता रुमानिया व स्लोव्हाकिया यांचे प्रत्येकी तीन गुण आहेत. बेल्जियम व युक्रेनला गुणाची प्रतीक्षा आहे.