| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
गौतम गंभीर भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक बनण्यापूर्वी आयपीएल चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरच्या आंतरराष्ट्रीय करिअरला नवसंजीवनी मिळू शकते. तो जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात पुनरागमन करू शकतो.
बीसीसीआयने गेल्या वर्षी श्रेयस अय्यरसह ईशान किशनला भारतीय संघाच्या केंद्रीय करारातून वगळले होते. हे दोघे देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्यास उत्सुक नसल्याचा ठपका बीसीसीआयने त्यांच्यावर ठेवला होता. यानंतर श्रेयस अय्यरने रणजी स्पर्धेत भाग घेतला. मुंबईकडून खेळताना त्याने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यांत 90 धावा ठोकल्या आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिले होते. याशिवाय 5 जुलै पासून झिम्बाब्वेविरुद्ध होणाऱ्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा पुढील आठवड्यात होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी मिळू शकते. सध्या हे खेळाडू बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहेत.







