Khanav Bridge: आठवडाभरानंतर खानाव पुलाची दुरुस्ती कूर्मगतीने!

सार्वजनिक बांधकाम विभागाची उदासीनता
प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना फटका

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग-रोहा मार्गावरील खानाव-वेळवली खानाव दरम्यानच्या पुलाला भगदाड पडून आठ दिवस उलटले, तरी दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाहतूक अद्याप बंद असल्याने प्रवाशांना वळसा घालून प्रवास करावा लागत असून, वाढीव भाड्याचा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे.

6 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात खानावजवळील पुलाच्या मधोमध मोठे भगदाड पडले. या दुर्घटनेत एका वृद्धाचा पाण्यात वाहून जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर प्रशासनाने अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूक तातडीने बंद केली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी वेळवली-खानाव-उसर हा पर्यायी मार्ग सुरू करण्यात आला, तर एसटी बस आणि अन्य अवजड वाहनांना सहाण बायपास, पाल्हे पूल, नागाव, चौल, वावे मार्गे वळविण्यात आले.

या पर्यायी मार्गामुळे प्रवासाचे अंतर वाढले असून, एसटीसह खासगी वाहनांचे भाडेही वाढल्याने प्रवाशांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार यांची मोठी गैरसोय होत आहे.

घटना घडून आठ दिवस उलटूनही दुरुस्तीच्या नावाखाली केवळ भगदाड अधिक मोठे करण्यात आल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असतानाही कामाला अपेक्षित वेग आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उदासीन कारभाराबाबत स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता दिनेश पराते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा दूरध्वनी बंद असल्याचे आढळले. पूल दुरुस्तीचे काम नेमके कधी पूर्ण होणार, वाहतूक पूर्ववत कधी सुरू होणार आणि नागरिकांची होणारी गैरसोय कधी थांबणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

युद्धपातळीवर काम पूर्ण करा!
एका निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरही दुरुस्तीच्या कामाचा वेग वाढत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतरही काम रेंगाळत ठेवणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहण्यासारखे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दिरंगाई थांबवून युद्धपातळीवर काम पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
Exit mobile version