| अलिबाग | प्रमोद जाधव |
गतवर्षी अवकाळी पावसामुळे हजारो आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. फळपीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दिवाळीत भरपाई देण्यात आली. मात्र, ही भरपाई तुटपुंजी मिळाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. लाखो रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना फक्त काही रक्कम भरपाई देऊन, तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, माणगांव, म्हसळा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते. जिल्ह्यात सुमारे वीस हजारहून अधिक आंबा उत्पादक शेतकरी आहेत.14 हजार हेक्टर क्षेत्र आंब्याचे असून, 12 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे.
गेल्या अनेक वर्षापासून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा बसत आहे. शेतकऱ्यांना फळपीक विम्यातून आर्थिक बळ मिळावे यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे म्हणून सरकारने प्रधानमंत्री फळ पीकविमा योजना सुुरू केली. हेक्टरी 29 हजार 400 रुपये विम्याचा हप्ता दरवर्षी शेतकऱ्यांकडून घेतला जात आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे सुमारे सात हजार 850आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये सुमारे चार हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाले.
रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी सात हजार 456 शेतकऱ्यांनी फळ पीक विम्यासाठी नोंदणी केली होती. दिवाळीत विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागली. परंतु ही रक्कम तुटपुंजी असल्याने शेतकरी नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. अवकाळी पावसामुळे गेल्यावर्षी अनेक शेतकऱ्यांचे दोन लाखापासून तीन लाखापर्यंतचे नुकसान झाले. मात्र, त्यांना फक्त 70 हजारपासून 75 हजार रुपयांपर्यंत विम्यामार्फत भरपाई मिळाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. देखभाल दुरुस्तीचा खर्चदेखील यातून निघाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
योग्य भरपाई द्यावी- माजी आ. पंडित पाटील
रायगड जिल्ह्यात विशेष करून कोकणात भातपीकानंतर आंबा उत्पादन हे प्रमुख पीक आहे. अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसत आला आहे. सरकार कोकणाबाबत कायमच दुजाभाव करीत आले आहे. वाढती मजूरी, औषधांच्या वाढत्या किंमतीमुळे उत्पादन खर्च अधिक आहे. त्यामुळे सरकारकडून विम्याच्या स्वरुपात मिळणारी भरपाई फारच कमी आहे. सरकारने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई योग्य द्यावी अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी केली आहे.
अशी करावी लागते मेहनत
झाडाच्या बाजूला असलेले गवत काढणे, सुकलेल्या फांद्या काढणे, झाडाच्या बाजूला खड्डा करून त्यावर पालापाचोळा टाकून सेंद्रीय खत तयार करणे, फवारणी करणे, आंबे काढणे, पेटीत ठेवणे, त्याची वाहतूक करणे अशा अनेक प्रकारची कामे शेतकऱ्यांना करावी लागतात. त्यामुळे साधारतः एक लाख रुपयांचा खर्च करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
विमा कंपन्या मालामाल, शेतकऱ्यांचे हाल
शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळाल्याने कृषी विभागाच्या आवाहनानंतर रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी सात हजार 754 शेतकऱ्यांनी विम्याची नोंदणी केली. 25 हजार रुपयांपासून 30 हजार रुपयांपर्यंत विम्याचा हप्ता घेण्यात आला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी एक लाख 40 हजार रुपये प्रमाणे भरपाई विमा कंपन्यांकडून देण्यात आला. जिल्ह्यात बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन गुंठावारी असून बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांची जमीन एकरीत आहे. शासनाच्या या जाचक नियमावलीमुळे शेतकऱ्यांचे हाल आणि विमा कंपन्या मालामाल अशी परिस्थिती दिसून येत आहे.
आंब्याचा मोहर लांबणीवर जाण्याची शक्यता
यंदा दिवाळीत आंब्याला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. परंतु ऐन दिवाळीतच अवकाळी पाऊस पडला. आलेला मोहर या पावसात गळून पडला. गेल्या दोन दिवसापासून पुन्हा वातावरणात बदल दिसून येत आहे. त्यामुळे आंब्याचा मोहर लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा एक महिना उशिरा आंबा बाजारात दाखल होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.