लघु पाटबंधारे चौकी बनली मद्यपींचा अड्डा

| सुतारवाडी | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षापासून सुतारवाडी लघु पाटबंधारे चौकीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून येथील निसर्गरम्य परिसरात मद्यपी हजेरी लावत असून येथील वृक्षाखाली दारूच्या आणि पाण्याच्या बाटल्या दिसून येत आहेत. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येथील बाब आणून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

येथील इमारतीची अधिक पडझड झाली आहे. सभोवताली कुंपण नसल्यामुळे कोणीही या परिसरात येत असतात या परिसराला वनवा लावण्याचे प्रकारही घडत आहेत. त्यामुळे चिकू, आंबा, फणस व अन्य फळझाडे जळून खाक होत आहेत. गेली वीस वर्षे या परिसरात नवीन झाडांची लागवड केलेली नाही. परिसरात अनेक फार्म हाऊस आणि रिसॉर्ट सुद्धा आहेत. त्यामुळे पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर वसुली होत असते. चौकीसाठी चौकीदार आणि सुसज्ज इमारत नसल्यामुळे येथील परिसर भग्न अवस्थेत दिसत आहे. मूळ जमीन मालक यांचे म्हणणे आहे की, येथील चौकीची नव्याने दुरुस्ती करावी नाहीतर मूळ मालक यांना ही जमीन परत करावी चौकीच्या दरवाजासमोर कोंबड्यांची पिसे व अन्य कचरा टाकल्यामुळे मोठी दुर्गंधी येत असते. येथील रहिवासी सचिन साळवी त्यांनी सांगितले की, येथील धरणातून पाण्याचा अनधिकृत उपसा होत असतो. याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. येथील चौकी लवकरात लवकर दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे.

Exit mobile version