स्मार्ट बसस्टॉपवर कचऱ्याचे साम्राज्य

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिकेने हरितक्रांती आणि प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरातील विविध भागांत अत्याधुनिक स्मार्ट बसस्टॉप उभारले आहेत. प्रत्येक बसस्टॉपसाठी सुमारे 27 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती असून, या बसस्टॉपमध्ये सौरऊर्जेवर चालणारी प्रकाशयोजना, सीसीटीव्ही कॅमेरे, पंखे तसेच इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मात्र, या स्मार्ट बसस्टॉपच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आले आहे. बस स्टॉपलगत बसविण्यात आलेले कचरा संकलन बॉक्स अनेक ठिकाणी तुडुंब भरलेले असून, वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने कचरा बाहेर साचत आहे. परिणामी दुर्गंधी पसरत असून प्रवाशांना अस्वच्छ वातावरणात बसावे व उभे राहावे लागत आहे. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या बसस्टॉपची शोभा कचऱ्यामुळे मलिन होत असून, नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. आधुनिक सुविधा उभारण्याबरोबरच त्यांची नियमित स्वच्छता व देखभाल करणेही तितकेच आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भरलेले कचरा बॉक्स तातडीने रिकामे करून बसस्टॉप परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांनी केली आहे. अन्यथा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version