उरणमध्ये ‌‘स्मार्ट’ सुविधा उपलब्ध

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प. उरण आगार येथे स्मार्ट कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ घेता येणार असून, भविष्यात सवलतींसाठी हे कार्ड अनिवार्य असणार असल्याचे आगार प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 50 टक्के सवलत, 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, सामान्य प्रवाशांसाठीही स्मार्ट कार्डचा वापर करून प्रवास अधिक सुलभ होणार आहे. या कार्डसाठी एकदाच 200 रुपये शुल्क आकारण्यात येणार असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार रिचार्ज सुविधा उपलब्ध आहे. रा.प. उरण आगार मार्फत राजेश शहा महावीर इंटरप्रयझेस राजपाल नाका येथे अधिकृत प्रतिनिधीमार्फत कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आगार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हे कार्ड नसल्यास भविष्यात कोणतीही सवलत मिळणार नाही आणि प्रवाशांना पूर्ण भाडे भरावे लागेल. त्यामुळे उरण तालुक्यातील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड काढून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Exit mobile version