वनखात्याची कारवाई, टोळीचा संशय; 48 लाखांचा मुद्देमाल जप्त
| रोहा | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा महामार्गावरून खैर लाकडापासून तयार केलेला ‘खैर द्रव’ तब्बल 435 ड्रममधून विनापास वाहतूक होत असल्याचे उघडकीस आले असून, वनखात्याने केलेल्या कारवाईत ट्रकसह सुमारे 48 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेशातील दोन जणांना अटक करण्यात आली. वनखात्याने खैर तस्करीच्या मोठ्या साखळीचा संशय व्यक्त केला आहे.
वनपरिमंडळ अधिकारी कोलाड यांच्या रिमांड रिपोर्टनुसार 3 सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे 4 वाजता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड पुलाजवळ रात्रीची गस्त घालत होते. त्यावेळी भिरा-कोलाड फाट्यावर मुंबईच्या दिशेने जाणारा यूपी 77/एटी 5450 क्रमांकाचा टाटा ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. ट्रकमध्ये खैर लाकडापासून तयार केलेले 435 ड्रम खैर द्रव, अंदाजे 29 टन वजनाचे आढळून आले. वनखात्याने तक्रारीमध्ये या मालाची अंदाजे किंमत 28 लाख रुपये, तर ट्रकची किंमत 20 लाख रुपये अशी नमूद असून, जप्त मुद्देमालाची एकूण अंदाजे किंमत 48 लाख रुपये असल्याचे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. याप्रकरणी ट्रक चालक इकरार वहिद बेग (35) आणि रहिम शामीर बेग (40), दोघेही उत्तर प्रदेशातील रहिवासी यांना अटक करण्यात आली. जप्त केलेल्या मालाचे मालक म्हणून विशाल मालवणकर यांचा उल्लेख रिमांड रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हा माल नेमका कुठून आला, त्यासाठी आवश्यक परवाने होते का आणि तो शासकीय जंगलातील खैरापासून तयार करण्यात आला आहे का? याचा तपास वनखात्याने सुरू केला आहे.
वनखात्याने तस्करी होत असलेल्या खैर लाकडापासून तयार केलेल्या द्रवपदार्थाची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करणे अत्यंत आवश्यक आहे. जर हा पदार्थ अन्नपदार्थ, पानमसाला किंवा औषधांमध्ये वापरला जात असेल किंवा तो मानवी आरोग्यासाठी घातक आणि असुरक्षित असेल, तर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन यावर कडक कारवाई करू शकते.
नितीन परब,
अध्यक्ष, रोहा सिटिझन फोरम ट्रस्ट







