गुजरातच्या एसटीमधून गुटख्याची तस्करी

चालकासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल
| महाड | प्रतिनिधी |
गुजरात राज्याच्या सूरत आगारातून महाडमध्ये येणार्‍या सूरत-महाड बसमधून होणारी गुटख्याची तस्करी उघडकीस आली असून, महाडमध्ये सर्रास होणारी गुटखा विक्री यामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. अनेकवेळा होणार्‍या कारवाईनंतरदेखील गुटखा विक्री सुरूच राहत असल्याने पोलीस प्रशासनाच्या कारवाईवरदेखील संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी सुरत आगाराचा आणि गुटखा विक्री करणार्‍या अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

महाड शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात स्टेट ट्रान्सपोर्टची सुरत महाड ही बस गेली अनेक वर्षे सुरु आहे. आज आलेल्या बसमध्ये गुटखा असल्याची माहिती महाड आगारप्रमुख शिवाजी जाधव यांना मिळाल्यानंतर त्यांनी चालकाकडे असलेल्या प्रवासी बॅगांची तापसणी केली असता त्यामध्ये लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. शिवाजी जाधव यांनी ही माहिती महाड शहर पोलीस ठाण्यात देताच शहर पोलिसांनी सर्व बॅगा ताब्यात घेतल्या. या बॅगांमधून सुमारे 64 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी एस.टी चालक अनिल बळीराम महाले, सुरत, नरेश बबन महाडिक, नितीन बबन महाडिक या तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version