वन विभागाची धडक कारवाई
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूरजवळील कशेडी घाटात खैर लाकडांची वाहतूक करणारे पिकअप वाहन वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून पकडले. भरदुपारी तपासणी नाक्यावरून गुंगारा देत पळून जाणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत अंदाजे 1 लाख रुपये किमतीची खैर लाकडे आणि सुमारे 9 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातून रत्नागिरी जिल्ह्यातील खैर व कात निर्मिती कारखान्यांचे राज्यस्तरीय कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने वाहन न थांबवता वेगाने पळ काढला. वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये खैराची लाकडे आढळून आली. प्राथमिक चौकशीत ही लाकडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेल्हे परिसरातून रत्नागिरी जिल्ह्याकडे नेली जात असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी शुभम मोरे रा. घोडेगाव, ता. चिपळूण आणि अजित मोरे रा. जेजुरी, पुणे यांच्याविरोधात वन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
रोहा येथील उपवनसंरक्षक डॉ. शैलेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेडगे, महाडचे वनक्षेत्रपाल आशिष पाटील, तसेच वनपाल तेजस नरे, आदेश जाधव, संदीप उतेकर आणि सचिन मेने यांनी ही कारवाई केली. जप्त केलेले वाहन व खैर लाकडे माणगाव येथील वन विभागाच्या डेपोमध्ये जमा करण्यात आली आहेत. पुढील तपास वनक्षेत्रपाल आशिष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.







