तर निवडणूक कामांवर बहिष्कार

अधिकारी मारहाण प्रकरणी कर्मचारी संघटनेची भुमिका
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांनी ग्रामपंचायत निवडणूक अधिकार्‍याला शिवीगाळ करीत आपल्या कार्यकर्त्यांना चिथावणी देत मारण्याचे आदेश दिल्यानंतर प्रांताधिकारी, तहसिलदारांच्या समक्ष निवडणूक अधिकारी मंगेश पाटील यांना मारहाण झाल्याने जिल्हा परिषद महासंघांने आक्रमक भुमिका घेतली आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन अधिकार्‍यांसमक्ष मारहाण होत असताना जर अधिकारी बघ्याची भुमिका घेत असतील तर यापुढे निवडणूकीची जबाबदारी नाकारण्याचा निर्णय घ्यावा लागेल अशी भुमिका जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचारी महासंघाने घेतली आहे.

अलिबाग तहसिलदार कार्यालयाच्या आवारातच प्रांताधिकारी प्रशांत ढगे आणि तहसिलदार मिनल दळवी यांच्या समक्ष घडली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणूक अधिकार्‍याला आमदारांनी शिविगाळ करीत कार्यकर्त्यांकरवी मारहाण केल्याची घटना घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. अशावेळी अधिकार्‍यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची आवश्यकत आहे. मात्र याबाबत कोणतीच भुमिका घेतली गेली नसल्याने जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महासंघाच्या पदाधिकार्‍यांची आज बैठक पार पडली. यात लेखा, ग्रामपंचायत, कृषी, पशूसंवर्धन, आरोग्य, पाणी पुरवठा तसेच ओमकार कर्मचारी अशा विविध संघटनांच्या जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. महासंघाचे अध्यक्ष डॉ कैलास चौलकर यांच्या उपस्थितीतील या बैठकीत या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

जबाबदार निवडणूक अधिकार्‍याला तहसिलदार आणि प्रांताधिकारी यांच्या समक्ष मारहाण होत असताना कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने या बैठकीत नाराजी व्यक्त केली गेली. यांसदर्भात आपली भुमिका निश्‍चित करण्यासाठी निवडणूकीनंतर मतमोजणी होताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांची भेट शिष्टमडंळाद्वारे घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ कैलास चौलकर यांनी दिली. याबाबत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही तर यापुढे निवडणूक प्रक्रियेत जिल्हा परिषदेचे अधिकारी सहभागी होणार नाहीत असा इशारा देखील देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे यावेळी प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांची देखील भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे चौलकर यांनी सांगितले.

आमदारांनी केलेल्या मारहाणीनंतर बीडीओ रजेवरच
असेसमेंटवरील अनधिकृत घराचा शिक्का काढण्याच्या मागणीला नकार दिल्याने आमदार महेंद्र दळवी आणि राजा केणी यांनी गटविकास अधिकार्‍याला मारहाण केल्याची घटना 5 ऑगस्ट रोजी घडली होती. अलिबाग पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांच्या दालनातच हा प्रकार घडला होता. या प्रकारानंतर दहशतीमुळे वैद्यकीय रजेवर गेलेले गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे दोन महिने उलटून गेले तरी पुन्हा सेवेवर हजर झालेले नाही. त्यांनी बदलीची मागणी केली आहे. असेच प्रकार घडत राहिले तर मात्र जिल्ह्यात आणि विशेष करुन अलिबाग तालुक्यात कोणीही अधिकारी काम करण्यास तयार होणार नाही अशी भीती व्यक्त होत आहे.

याप्रकरणी तहसिलदार मीनल दळवी यांच्याशी चर्चा करुन काय कारवाई करण्यात आली याबाबत माहिती घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल.

– प्रशांत ढगे, प्रांताधिकारी अलिबाग उपविभाग
Exit mobile version