। सांगली । प्रतिनिधी ।
देशाच्या सीमेवर सहा महिन्यांपासून पंजाबमधील शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्याकडे केंद्र शासन दुर्लक्ष करीत आहे. बाजार समितीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. त्याला रोखण्यासाठी कृषी कायदे करण्यात येत असल्याचे केंद्रातील राज्यकर्त्यांचे मत आहे. बाजार समितीतील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी समाजसेवक अण्णा हजारेंनी उपोषण करावे, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव भालचंद्र कानगो यांनी केले. विटा, ता.खानापूर येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठात क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार कॉ. कानगो यांना प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी अॅड. सुभाष पाटील, सुभाष पवार, सुजाता कानगो, अॅड. नानासाहेब पाटील, सांगळेबाबा विचारमंचावर प्रमुख उपस्थित होते. यापुढे कॉ. कानगो म्हणाले, स्वातंत्र चळवळीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासह क्रांतिकारकांनी माणूस केंद्रबिंदू ठेवून काम केले होते. सध्या मन की बात सांगणारे माणूस केंद्रबिंदू ठेवून विकासाच्या संकल्पना मांडत नाहीत. तर भांडवलदारांच्या हितासाठी अर्थिक धोरण राबविले जात आहेत. अर्थव्यवस्थेला मानवी चेहरा द्यायला हवा, माणूसकेंद्रीत विकास करण्यासाठी समाजवादी व्यवस्था निर्माण करायला हवी.
प्राचार्य डॉ. मेणसे म्हणाले, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आयुष्यभर रस्त्यावरील आणि संसदेत संघर्ष केला. ज्यांचा देशाच्या स्वातंत्र्य चळवळीशी कसाही संबंध नाही. ती मंडळी देशाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यांना स्वातंत्र्य, समता, सामाजिक न्याय ही मूल्य मान्य नाहीत. त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे. महाराष्ट्राचा पाया ज्या सहकार चळवळीवर राहिला. ती चळवळ मोडीत काढण्याचा डाव मांडला आहे. संसदेचे कामकाज होऊ द्यायचे नाही. जेणेकरून संसंद बदनाम झाली पाहिजे, असे षडयंत्र आखले असल्याचा आरोप डॉ. मेणसे यांनी केला.
किमया पाटील हिने प्रारंभी साने गुरुजींची प्रार्थना सादर केली. स्वागत व प्रास्ताविक अॅड. सुभाष पाटील यांनी केले. मानपत्र वाचन अॅड. नानासाहेब पाटील यांनी केले.
पुरस्कार वितरणास किसान सभेचे अध्यक्ष नामदेव गावडे, कॉ. शंकर पुजारी, ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव, भाई संपतराव पवार, रयत शिक्षणचे माधवराव मोहिते, प्राचार्य डॉ. एस. बी. मोरे, दादासाहेब ढेरे, सुशील लाड, दिलीप सव्वाशे, गौतम काटकर, प्रा. सिध्देश्वर सपकाळ, अॅड. सतीश लोखंडे, श्रीमंत कोकाटे, देवकुमार दुपटे, विश्वनाथ गायकवाड अॅड. कृष्णा पाटील , प्रा. विलास पाटील , मारूती शिरतोडे, बाबासाहेब लाड, क्रांतिसिंह नाना पाटील दूध संघाचे जयराम मोरे, रघुराज मेटकरी, नंदू हात्तेकर, इंद्रजीत पाटील, धम्मसागर भारती यांच्यासह पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते. आभार ए. एस. कांबळे यांनी मानले…
पुरस्काराची रक्कम किसान सभेकडे सुर्पुद
क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराची मिळालेली रोख भालचंद्र कांगो यांनी शेतकर्यांच्या हितासाठी कार्यरत असणार्या किसान सभेला देण्याचा निर्णय घेतला. किसान सभेचे अध्यक्ष नामदेव गावडे यांच्याकडे त्यांनी ती रक्कम सुपूर्द केली. यावरुन कानगो यांची शेतकर्यांप्रती असलेली कळकळ अधोरेखित झाली.