। अलिबाग । प्रमोद जाधव ।
गणेशोत्सव हा आता केवळ धार्मिक उत्सव राहिला नाही, तर तो एक सांस्कृतिक उत्सव बनला आहे. या उत्सवाला चांगले वळण लावण्यासाठी व चुकीच्या गोष्टी बंद होण्यासाठी प्रभावी जनप्रबोधन रायगड जिल्ह्यातील अनेक गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात येत आहे. बेटी बचाव बेटी पढाव, झाडे लावा झाडे जगवा, प्लास्टिक मुक्ती, पाणी वाचवा अशा अनेक प्रकारचे देखावे, चलचित्रातून दाखवून जनजानगृृती केली जात आहे. या चलचित्रांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान, या मंडळांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
कोकणासह रायगड जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मुंबई, पुणेला नोकरीनिमित्त असलेले चाकरमानी सुट्टी काढून गावी येतात. आबालवृध्दांपासून सर्वच जण एकत्र येऊन हा सण आनंदमय व मंगलमय वातावरणात साजरा करतात. जिल्ह्यामध्ये घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातील काही मंडळी एकत्र येऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ निर्माण करून त्यांच्यामार्फत गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. ही परंपरा आजही रायगड जिल्ह्यात जपली आहे.
जिल्ह्यात यावर्षी सार्वजनिक गणेशोेत्सव मंडळांमार्फत 273 गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यात अनंत चतुर्दशीपर्यंत 114 गणेशमूर्तींचा समावेश आहे. मंडळांमार्फत कापडी पिशवी वाटप करून प्लास्टिकमुक्तीचा संदेश देण्याचे काम केले जात आहे. महिला, तरुणींवरील अत्याचार रोखण्यासाठी बेटी बचाव, बेटी पढावसारखे उपक्रम राबवून महिलेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न चलचित्रातून केला आहे. काही मंडळांनी जातीय सलोखादेखील राखण्याचे काम केले आहे. त्यामध्ये अलिबाग शहरातील जुन्या बाजारपेठमधील सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचा समावेश आहे. कारण, या मंडळामध्ये सर्व जाती-धर्माची मंडळी एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करीत आहेत.
जिल्ह्यात पाण्याच्या प्रश्नाबरोबरच पर्यावरणाचा समतोल बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाणी जपून वापरा, झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत समाजप्रबोधनाचे काम अनेक मंडळांकडून करण्यात आले आहे. मंडळाकडून होत असलेल्या समाजप्रबोधनामुळे समाजात परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न कायमच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आदर्श गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक संदेश
सध्या संपूर्ण जगात पेटून उठलेला विषय म्हणजे महिलांवरील होणार्या अत्याचाराबाबत मुलींनी, महिलांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबतचा महत्त्व पटवून देणारा संदेश अलिबागमधील आदर्श गणेशोत्सव मंडळाने दिला आहे. समाजाला बोध घेता येईल असे सामाजिक संदेश देणारे चलचित्र देखाव्यातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.