जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू व खाऊ वाटप
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग तालुक्यातील परहूर येथील श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमात शेकाप तालुका महिला आघाडीच्या वतीने आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत संवाद साधत त्यांना भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्यासमवेत वाढदिवस साजरा करून आपुलकीचा आणि मायेचा स्पर्श देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शेकापच्या विविध आघाड्यांमार्फत शालेय साहित्य वाटप, गोरगरिबांना छत्री वाटप, गरजूंना मदतीचा हात अशा अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग तालुका शेकाप महिला आघाडीने परहूर येथील श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमाची निवड करून तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत हा उपक्रम राबविला. यावेळी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांसोबत केक कापून जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित महिलांनी वृद्धांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांची विचारपूस केली. भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करून त्यांना सन्मानाची वागणूक देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही दिला.
या कार्यक्रमास शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, अलिबाग पंचायत समिती सदस्य अंजली ठाकूर, शेकाप महिला आघाडीच्या अनिता पवार, अनिता काकडे, भैरवी जाधव, स्नेहल पाटील, तन्वी पाटील, मनीषा रेलकर, श्री समर्थ कृपा वृद्धाश्रमाचे संचालक ॲड. जयेंद्र गुंजाळ तसेच वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
