संघटनात्मक बांधणीसाठी प्रशिक्षण शिबीर उत्साहात
| मुंबई | प्रतिनिधी |
राज्यातील जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाने आता डिजिटल माध्यमांवरही आपली ताकद वाढविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून पक्षाच्या विचारांचा, आंदोलनांचा आणि जनहिताच्या लढ्यांचा आवाज अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्यासाठी शेकापकडून रविवार, दि. 1 नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई येथील पक्षाच्या कार्यालयात आयोजित या प्रशिक्षण शिबिरात सोशल मीडियाचा प्रभावी वापर, डिजिटल माध्यमांद्वारे पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे, पक्षाच्या आंदोलनांना आणि जनहिताच्या प्रश्नांना व्यापक प्रसिद्धी देणे, तसेच आधुनिक डिजिटल साधनांचा वापर याबाबत शेकापच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख तथा राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, पुरोगामी युवा संघटनेच्या अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पुरोगामी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवा पाटील, रायगड जिल्हा सोशल मीडिया प्रमुख संदीप दिघोडकर, माजी नगरसेविका संजना कीर, अलिबाग तालुका सोशल मीडिया प्रमुख प्रकाश म्हात्रे, अलिबाग तालुका पुरोगामी युवक संघटना प्रमुख विक्रांत वार्डे, अलिबाग तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, दीपक पाटील, अमोल नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी रायगड जिल्ह्यासह कोल्हापूर, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. पारंपरिक राजकीय संघर्षासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी थेट संवाद साधणे, तरुण पिढीपर्यंत पक्षाचे विचार पोहोचविणे आणि डिजिटल व्यासपीठावर पक्षाची संघटनात्मक ताकद निर्माण करणे, हा या उपक्रमामागील महत्त्वाचा उद्देश आहे. रस्त्यावरचा संघर्ष आणि डिजिटल माध्यमांवरील लढा यांची सांगड घालत शेकापने आधुनिक काळातील राजकीय संवादाचे नवे पर्व सुरू करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.






