। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
संगमेश्वर तालुक्यातील दोन हजार शेतकर्यांचे पीएम कुसूम सौरपंप योजनेचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. ही चांगली योजना शेतकर्यांसाठी उभी राहत असल्याचे सरकारने जाहीर केले; परंतु, प्रत्यक्षात मात्र तिची अंमलबजावणी कासवगतीने सुरू आहे. यामुळे कोकणात शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सरकारी यंत्रणांचा ढिसाळ कारभार आणि उदासीनतेचा शेतकर्यांना फटका बसत आहे. शासन दरवर्षी नवीन घोषणा, योजनांचे नवे फलक आणि मोठमोठ्या भाषणांतून शेतकर्यांचे भले करण्याचे वचन देते. याच योजनांवर अंमलबजावणीच्या नावाखाली वर्षानुवर्षे कागदोपत्री खेळ सुरू असतो. संगमेश्वर तालुक्यातील शेतकरी आजही या सौरपंपाच्या प्रतीक्षेत आहेत. 2 हजार अर्ज प्रलंबित आहेत, म्हणजे या शेतकरी कुटुंबांचे स्वप्न अजूनही साकार व्हायचे आहे.
शेतकर्यांच्या समस्यांकडे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. नवीन योजनांचे उद्घाटन करण्यापूर्वी जुन्या योजनांच्या अंमलबजावणीकडे लक्ष द्यायची गरज आहे. शेतकर्यांना तातडीने सौरपंप मिळावेत आणि कोकणातील शेती वाचवायची असेल, तर या शेतकर्यांना तातडीने सौरपंप योजना मिळून देणे गरजेचे आहे. शेतकर्यांच्या अर्जाचा तातडीने निपटारा करावा. याबाबत जलदगतीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. सौर पंप योजनेला गती न मिळाल्यास लाभार्थी शेतकरी आक्रमक होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.