फळे खरेदीकडे ग्राहकांचा कल
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणात आरोग्याची भर टाकण्यासाठी बाजारात देशी-विदेशी फळांची रेलचेल झाली आहे. त्यांचे दरही आवाक्यात असून चिपळूणतील नागरिक फळांवर ताव मारताना दिसत आहेत.
चिपळूण शहर, खेर्डी, सावर्डे, आरवली बाजारपेठेत रस्त्यालगत फळ विक्री होत आहे. संत्री, मोसंबी, पेरू, सीताफळ, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, अननस यांसारख्या देशी फळांची आवक वाढली आहे. मार्गशीर्ष या उपवासाच्या महिन्यामुळेही भाज्या व फळांची रेलचेल आहे. उपवास आणि पुजेसाठी फळांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे. शहरातील भाजी मंडई परिसरात दररोज पहाटे कित्येक टन फळाची आवक होते. त्यानंतर ती किरकोळ विक्रीसाठी पाठवली जात आहेत. यावेळी, कॅलिफोर्नियातून आलेली लाल-काळी द्राक्षेही भाव खात आहेत. ही गोल, गरगरीत द्राक्षे चवीला फार गोड नसली, तरी टेबलफ्रुट म्हणून डायनिंग टेबलवर जागा मिळवत आहेत. तसेच, ‘क’ जीवनसत्त्व असणारे व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरले जाणारे अॅवाकेडोदेखील भाव खाऊन आहेत. 100 रुपयांना नग यानुसार त्यांची विक्री सुरू आहे.
फळांचे किरकोळ दर
भारतीय सफरचंद 120 ते 140, इराणी सफरचंद 180 ते 200, आयात सफरचंद 250 ते 260, मोसंबी 100, नागपूर संत्री 60 ते 70, सीताफळ 80 ते 100, पेरू 60 ते 80, अॅपल बोरे 40 ते 70, ड्रॅगन फ्रुट 70 ते 80, डाळिंब 180 ते 200 (सर्व दर प्रतिकिलो), पपई एक नग 30 ते 50, किवी 80 ते 100 रुपये बॉक्स, कलिंगड 80 ते 100, अननस 60 ते 100.
फळे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. सध्या विविध देशी-विदेशी फळांचा हंगाम जोरात असल्याने बाजारातही आवक वाढली आहे. दर स्थिर असल्याने ग्राहक फळे खाण्याचा आनंद घेत आहेत.
– सुरज बागवान, फळ विक्रेता