। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
कणकवली नगरपंचायतीतर्फे गेल्या तीन दिवसांपासून एकल वापर प्लास्टिकचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई सत्र राबविण्यात येत आहे. यामध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, वस्तू वापरणार्या 45 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 20 हजार 300 रुपये दंड वसुली करण्यात आली. एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दर महिन्याला मोहीम राबिवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे कारवाई सत्र राबविण्यात आले आहे. फिरते विक्रेते, फुल विक्रेते, स्थानिक बाजारपेठेतील विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि दुकानांची तपासणी करत ही कारवाई करण्यात आली. यामध्ये 35 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.