शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीची दखल; सहा महिन्यांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी
| गडचिरोली | प्रतिनिधी |
सहा महिन्यांपासून सोलर पंपाची प्रतीक्षा करणाऱ्या मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. शेतकरी कामगार पक्षाने विद्युत विभागाला दिलेल्या निवेदनासह बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर विभागाने तातडीने हालचाली करत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविले आहे. त्यामुळे रखडलेले सोलर पंप आता लवकरच शेतांमध्ये बसविले जाणार असून, शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याला यश आल्याचे बोलले जात आहे.
मुलचेरा तालुक्यासह अहेरी उपविभागातील अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेसाठी शासनाकडे आपली अग्रीम रक्कम वेळेत भरली होती. फेब्रुवारी महिन्यात पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आपल्या हिस्स्याची अग्रीम रक्कम ऑनलाइन पद्धतीने शासनाकडे जमा केली. मात्र, रक्कम भरून तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटूनही विद्युत विभागाकडून शेतकऱ्यांच्या शेतात सोलर पंप बसवून देण्यात आले नव्हते. त्यामुळे पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.
या समस्येची दखल घेत शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांनी विद्युत विभागाकडे निवेदन सादर करून पात्र शेतकऱ्यांच्या शेतात तातडीने सोलर पंप बसवून देण्याची मागणी केली होती. मुलचेरा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे हे निवेदन देण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी शासनाकडे आपल्या हिस्स्याची रक्कम वेळेत भरूनही विद्युत विभागाच्या वेळकाढू धोरणामुळे सोलर पंप बसविण्याचे काम रखडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागत होता. यामुळे शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत, सोलर पंप तातडीने बसवून न दिल्यास आलापल्ली येथील विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाई चिरंजीव पेंदाम यांनी दिला होता. या इशाऱ्याची विद्युत विभागाने दखल घेत तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. अहेरी उपविभागातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या दारात सोलर पंपाचे साहित्य पोहोचविण्यात आले असून, लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात पंप बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे मुलचेरा तालुका चिटणीस भाई चिरंजीव पेंदाम यांच्या पाठपुराव्यामुळे सोलर पंपाचे साहित्य आपल्या दारात पोहोचल्याने लाभार्थी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लाभार्थी भुरू गंगा पेंडाम, गुरुदास गोविंदा सेडमेक तसेच एट्टापल्ली आणि चामोर्शी तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी भाई चिरंजीव पेंदाम तसेच शेतकरी कामगार पक्षाचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासन आणि विद्युत विभागाला तातडीने कार्यवाही करावी लागल्याने, शेतकरी कामगार पक्षाच्या मागणीला अखेर यश मिळाले, अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्तुळातून व्यक्त होत आहे.
