आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
। नवीन पनवेल । वार्ताहर ।
गुढीपाडव्याचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस, नगरसेवक गणेश कडू यांच्या संकल्पनेतून सेक्टर 15, नवीन पनवेल बसस्थानक येथे मोफत सोलर मोबाईल चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते पार पडले. सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे.
शेकापचे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्या संकल्पनेतून स्व. चंद्रकांत मारुती कडू यांच्या स्मरणार्थ मोफत सोलर मोबाईल चार्जिंगची सेवा उपलब्ध करून देण्यात आली. नवीन पनवेल सेक्टर 15, एमईसीबी ऑफिसजवळील सिद्धीविनायक सोशल संस्था बसस्थानक आणि स्व. पंढरीनाथ सदाशिव आरु यांच्या स्मरणार्थ नवीन पनवेल येथील हॉटेल नीलकमलसमोर मोफत सोलर मोबाईल चार्जिंग सेवा नवीन पनवेल परिसरातील गरजू नागरिकांसाठी सुरु करण्यात आली.
यावेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, डॉ. गिरीष गुणे, माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, महाविकास आघाडी पनवेलचे अध्यक्ष बबन पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी. घरत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, नारायण घरत, काशीनाथ पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, देवेंद्र पाटील, समाजवादी पार्टी जिल्हाध्यक्ष अनिल नाईक तसेच महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका पनवेल व शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.