| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती करून राहात आहे. त्यात मूळ रहिवासी असलेल्या आदिवासी समाजाच्या वस्तीला लागून वन जमीन आहे. या वन जमिनीसंदर्भातील प्रश्न नवी दिल्ली येथील संबंधित असून, हे सर्व प्रश्न सोडवावे, अशी मागणी करणारे निवेदन खा. श्रीरंग बारणे यांना कर्जत तालुका आदिवासी संघटनेच्यावतीने देण्यात आले.
कर्जत तालुक्यातील वन जमिनीच्या प्रश्नावर कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेने मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांची पुणे येथील कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी आदिवासी समाज संघटनेचे अध्यक्ष परशुराम दरवडा, तसेच सहसचिव नितीन निरगुडा, सल्लागार मनोहर दरवडा, जयवंत उघडा, भरत आगिवले, हरिश्चंद्र फसाळी आदी उपस्थित होते. कर्जत तालुका हा बहुल आदिवासी तालुका आहे.या कर्जत तालुक्यातील आदिवासी भागात प्रामुख्याने आदिवासी बांधवांच्या समस्या आहेत, त्या समस्यांचे निवारण शासन स्तरावरून व्हावे, असे निवेदन देण्यात आले. आदिवासी लोकांच्या घरांच्या तसेच रस्त्याच्या आणि नळपाणी योजना या वन जमिनीचा परवानगी मिळत नसल्याने पूर्ण होत नाहीत.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार खासदार बारणे यांच्या माध्यमातून व्हावा अशी मागणी आदिवासी संघटनेने केली.
कर्जत तालुका आदिवासी संघटनेने दिलेल्या निवेदनात वन जमिनी आणि दळी जमिनीबाबत निर्णय व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. आदिवासी समाजाच्या जमिनीबाबत निर्णय घेऊन त्या जमिनी 7/12 नावे करावेत, नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन असल्याने शासकीय सुट्टी जाहीर करावी. आदिवासीबहुल कर्जत तालुक्यामध्ये पेसा कायदा लागू करण्यात यावा. नेरळ, कर्जत आणि कळंब येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण करावीत. शिक्षकभरती केली जात असताना ती भरती शासनामार्फत करावी.तालुक्यातील आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा करावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आले.







