सोमनाथ माळी यांचा स्वेरीत सत्कार

पंढरपूर । प्रतिनिीधी ।
रस्ते खडतर असताना देखील परिस्थितीचा कोणताही बाऊ न करता जे यश प्राप्त होते त्याची चर्चा दीर्घकाळ चालत असते. असेच यश सोमनाथ माळी यांनी मिळविले आहे. अशक्य वाटणारे यश हे वैचारिक बैठकीच्या पाठबळावर सहज साध्य होऊ शकते. त्याचेच उदाहरण म्हणजे इस्त्रोचे नूतन शास्त्रज्ञ सोमनाथ माळी हे होय. छोट्या वयातच त्यांनी यशाचे शिखर गाठले आणि स्वप्नवत वाटणार्‍या ध्येयाला गवसणी घातली. हे खरोखरच कौतुकास्पद आहे.फ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.

भारतातून दहा जणांची व महाराष्ट्रामधून एकमेव निवड झालेल्या तसेच आई वडील मोलमजुरी करत असलेल्या सरकोली (ता. पंढरपूर) येथील सोमनाथ माळी यांची तिरुअनंतपुरम (केरळ) येथील मविक्रम साराभाई स्पेस सेंटरफ मध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून नुकतीच निवड झाली आहे. यामुळे शास्त्रज्ञ सोमनाथ माळी यांचा स्वेरी परिवाराच्या वतीने संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना इस्त्रोचे नूतन शास्त्रज्ञ सोमनाथ माळी म्हणाले की, मी शिक्षणाच्या बाबतीत स्वेरीचे नाव खूप ठिकाणी ऐकत आहे. स्वेरीतील माझे विद्यार्थी मित्र देखील स्वेरीतील गुणवत्तेबाबत सतत चर्चा करत असतात. स्वेरीतील विद्यार्थ्यांसाठी असणार्‍या सोयी-सुविधा, शिस्त, अभ्यासासाठी असणारा पाठपुरावा, संवाद, यामुळे स्वेरीत प्रवेश घेणारे विद्यार्थी खरोखरच करिअरच्या दृष्टीने उत्तम आणि योग्य वाटचाल करत आहेत.कितीही अपयश आले तरी खचून जाऊ नये. संयम ठेऊन आपले कार्य करत राहावे. यश आपोआप मिळेल. भारताचे माजी राष्ट्रपती दिवंगत शास्त्रज्ञ डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम हे माझे आदर्श असून त्यांचे अग्निपंख आणि ट्रांन्सफार्मर ड्रीम्स इन टू एक्सलन्स ही दोन पुस्तके खूप भावली. या पुस्तकांमुळेच आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली.यावेळी आबासाहेब दैठणकर, सचिन माळी, गोपाळ माळी, प्रेमलता रोंगे,डॉ.प्रशांत पवार, इतर अधिष्ठाता, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले तर विद्यार्थी अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी आभार मानले.

Exit mobile version