| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
आयसीसी पुरूष टी-20 विश्वचषकामध्ये शनिवारी (दि.14) दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने सलग तीन सामने जिंकले असून न्यूझीलंडने आपला पहिला सामना गमावला. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावत 175 धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने कर्णधार एडन मार्करमच्या स्फोटक खेळीमुळे 17.1 षटकातच लक्ष्य गाठले. यामुळे ‘ड’ गटात दक्षिण आफ्रिका गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आली आहे.
फलंदाजीसाठी आलेल्या न्यूझीलंडने पॉवरप्लेमध्येच 3 गडी गमावले. यान्सेनने टाकलेले ते सहावे षटक न्यूझीलंडसाठी चांगलेच भारी पडले. त्यामध्ये त्याने रविंद्र आणि ऍलन यांचे बळी घेतले. न्यूझीलंडकडून एकाही खेळाडूने अर्धशतक केले नाही. ऍलनने सुरूवात चांगली केली होती; मात्र, यान्सेनच्या गोलंदाजीपुढे त्याचा निभाव लागला नाही. तो 17 चेंडूत 31 धावा करत बाद झाला. किवीकडनू चॅपमनची खेळी सर्वोत्तम ठरली. त्याने 26 चेंडूत 48 धावा काढल्या. तसेच त्याने डॅरिल मिचेलसोबत पाचव्या विकेटसाठी केलेली 74 धावांची भागीदारी न्यूझीलंडकडून या सामन्यातील सर्वात मोठी भागीदारी ठरली. मिचेलने 32 धावा काढल्या. या स्पर्धेत न्यूझीलंडचा पुढील सामना 17 फेब्रुवारीला कॅनडाविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा 18 फेब्रुवारीला युएईविरुद्ध आहे. तसेच दक्षिण आफ्रिका सुपर-8मध्ये पोहोचला आहे.
दक्षिण आफ्रिकेची विजयाची हॅटट्रीक
