दक्षिण आफ्रिकेचा धमाकेदार विजय

| मुंबई | वृत्तसंस्था |

दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटात कॅनडावर दणदणीत विजय मिळवला. एडन मार्करमच्या अर्धशतकी खेळीला रायन रिकेल्टन, डेव्हिड मिलर व त्रिस्तान स्तब्स यांची साथ मिळाली आणि आफ्रिकेने मोठे आव्हान उभे केले.

कॅनडाच्या नवनीत धलिवालने अर्धशतक झळकावून चांगली झुंज दिली, परंतु ती अपयशी ठरली. आफ्रिकेने 57 धावांनी सामना जिंकला आणि 2.850 नेट रन रेटसह ड गटात अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंड 2 गुण व 1162 नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. कॅनडाने नाणेफेक जिंकून बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीला बोलावण्याचे धाडस दाखवले.

त्यांना सुरुवातीला यश मिळाले असते, परंतु क्विंटन डी कॉकचा झेल टाकला. आफ्रिकेच्या सलामीच्या जोडीने 10च्या सरासरीने धावा कुटल्या.
दिलप्रीत बाजवाने कॅनडाला पहिले यश मिळवून देताना क्विंटनचा त्रिफळा उडवला. कर्णधार एडन मार्करमने चांगली फटकेबाजी करताना धावांची गती कायम राखली. त्याने 32 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारासह 59 धावा केल्या. अंश पटेलच्या चेंडूवर मार्करमने उत्तुंग फटका मारला होता आणि डिलॉन हेयलिगरने सीमारेषेवर झेप घेत चेंडू पकडला.

हेयलिगरच्या या झेलने साऱ्यांना चकित केले. मार्करम व रायन रिकेल्टन यांची 56 धावांची भागीदारी 12 व्या षटकात तुटली. त्यानंतर 14व्या षटकात पटेलने दुसरा सेट फलंदाज रिकेल्टनला झेलबाद केले. त्याच षटकात डेवॉल्ड ब्रेव्हिसला गुगलीवर मोठा फटका मारण्यास भाग पाडून झेलबाद केले. कॅनडाने दोन षटकांत सामन्यात चांगले पुनरागमन केले. अंश पटेलने तीन विकेट्स घेत सामन्याला नाट्यमय वळण दिले. पण, त्रिस्तान स्तब्स व डेव्हिड मिलर यांनी आक्रमक फटकेबाजी केली. या दोघांनी 39 चेंडूंत 75 धावांची भागीदारी करताना संघाला 4 बाद 213 धावांपर्यंत पोहोचवले. स्तब्सने 19 चेंडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 34 धावा कुटल्या, तर मिलरनेही 23 चेंडूंत 1 चौकार व 3 षटकारांसह 39 धावांची नाबाद खेळी केली. अंश पटेलने 4-0-31-3 अशी अप्रतिम स्पेल टाकली.

Exit mobile version