दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना!

महायुतीकडून उमेदवाराची चाचपणी सुरूच

| मुंबई | प्रतिनिधी |

महाविकास आघाडीकडून दक्षिण मुंबई लोकसभेची जागा ठाकरेंना सुटली असून, ठाकरेंनी अरविंद सावंत यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. याच पार्श्‍वभूमीवर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दक्षिण मुंबईच्या जागेवरुन मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर दक्षिण मुंबई लोकसभा मतदासंघांचा तिढा पुढच्या दोन दिवसांत सुटणार असल्याची चर्चा आहे.

सागर बंगल्यावर झालेल्या या बैठकीत राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, पियूष गोयलदेखील उपस्थित होते. इच्छुक उमेदवार मंगल प्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर या दोघांनाही मतदार संघात काम सुरू ठेवण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांत दक्षिण मुंबई मतदारसंघाचा कोण उमेदवार असणार हे स्पष्ट होणार आहे.

दक्षिण मुंबईच्या जागेवर भाजपाकडून दावा करण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा इच्छुक आहे. या पार्श्‍वभूमीवर दोघंही मतदारसंघात भेटीगाठी घेत असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांपासून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ चर्चेचा विषय बनला आहे. कारण, महायुतीत भाजप आणि शिवसेना दोनही पक्षाकडून या मतदारसंघावर दावा केला जातोय. मोदी फॅक्टरमुळे भाजप दक्षिण मुंबई सहज जिंकेल, असे भाजपचे मत आहे.

Exit mobile version