थेट गावातून लालपरी पंढरपुरात

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने 97 एसटी बसचे नियोजन केले आहे. त्यामध्ये 12 लालपरी थेट पंढरपुरात दाखल होणार आहेत. यातील काही बसेस शुक्रवारी पंढरीच्या वारीला निघाल्या, तर काही बसेस शनिवारी निघल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्त विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतात. सर्व भाविकांसाठी उत्सवाचा दिवस म्हणून मानला जातो. त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ रायगड विभागाने विशेष ज्यादा एसटी बसेसचे नियोजन केले होते.

रायगड विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अलिबाग, पेण, कर्जत, महाड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा व माणगाव या आगारामार्फत एसटी बसच बुकींगची व्यवस्था करण्यात आली होती. 40 अथवा त्यापेक्षा अधिक भाविक एकत्र आल्यास त्यांच्यासाठी थेट गावातून पंढपुरात जाण्यासाठी विशेष बससेवा सुरु करण्यात आली. तसेच ज्यादा एसटी बसेसची व्यवस्थादेखील वेगळी करण्यात आली होती.

आषाढी एकादशीनिमित्त जिल्ह्यातून ज्यादा 85 एसटी बसेस सोडण्यात आल्या आहेत. भाविकांकडून एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तसेच थेट गावातून पंढरपुरात जाण्यासाठी 12 बसेसला मागणी आल्याचे सांगण्यात आले. आषाढी एकादशीनिमित्त 97 एसटी बसेस भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत. प्रत्येक आगारातून साधारणपणे दहा ते 13 बसेस पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आगारातील एसटी बसच्या काही फेऱ्या रद्द करण्याची वेळ महामंडळावर आली. नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला. 27 जुलैपर्यंत प्रवाशांना त्रास होणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन एसटी महामंडळ रायगड विभागाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version