पनवेल वाहतूक शाखेचा विशेष सत्कार

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील संवाद हॉलमध्ये जिल्हास्तरीय बाल सुरक्षा व वाहतूक विषयक महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित शालेय वाहतुकीसाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकाभिमुख कार्याबद्दल पनवेल शहर वाहतूक शाखेचा विशेष सत्कार करण्यात आला.

या बैठकीस पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) राहुल खाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक) गावडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याशिवाय विविध शाळांचे मुख्याध्यापक, शाळा प्रतिनिधी, शालेय बस मालक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स व संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

बैठकीत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय वाहनांमध्ये GPS (VLTT) प्रणाली अनिवार्य करणे, अग्निसुरक्षा नियमांचे पालन, डिजिटल उपस्थिती प्रणाली, सीसीटीव्ही फुटेज किमान तीन महिने जतन करणे, नियमित विद्यार्थी-पालक बैठकांचे आयोजन, चालकांचे वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, सहा वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी महिला अटेंडंटची नियुक्ती तसेच प्रत्येक चालकाने दरवर्षी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सादर करणे आदी महत्त्वाच्या सूचनांची माहिती दिली.

यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि पोलीस उपायुक्त राहुल खाडे यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. शाळा प्रशासन, वाहन चालक, ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स आणि पालक यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणतीही तडजोड होऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सर्व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून सुरक्षित, शिस्तबद्ध व अपघातमुक्त शालेय वाहतूक व्यवस्था उभारण्याचे आवाहन करण्यात आले.

Exit mobile version