हॉकी इंडियाकडून श्रीजेशचा विशेष सन्मान

‌‘जर्सी नंबर 16′ निवृत्त

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकी इंडियाने जबरदस्त कामगिरी करत सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले आहे. या विजयात दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेशची भूमिका महत्वाची ठरली. तसेच, त्याने ‌‘द वॉल’ असल्याचे या स्पर्धेत सिद्ध करून दाखवले आहे. दरम्यान पीआर श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्ती घेतली आहे. याचबरोबर पीआर श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सी सुद्धा निवृत्त करण्यात आली आहे.

पीआर श्रीजेशचे ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न होते. मात्र, ते पूर्ण झाले नाही. परंतु, भारतीय संघाने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आहे. भारताच्या या यशात गोलकीपर श्रीजेशचे मोठे योगदान होते. त्याच्या या योगदानाची दखल घेत हॉकी इंडियाने मोठा निर्णय घेत त्याच्या 16 क्रमांकाच्या जर्सीच्या निवृत्तीची घोषणा हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी केली आहे.

श्रीजेशने आपल्या जवळपास दोन दशकांच्या कारकिर्दीत 16 क्रमांकाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीत त्याने भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये संस्मरणीय कामगिरी केलेली आहे. त्याचीच दखल घेत हॉकी इंडियाने हा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. श्रीजेशसह त्याची 16 क्रमांकाची जर्सीही निवृत्त झाली आहे. आता ही जर्सी अन्य कोणताही खेळाडू परिधान करू शकणार नाही.

36 वर्षीय पीआर श्रीजेशने हॉकीमधून निवृत्ती घेतली असली तरी तो हॉकीशी जोडलेला राहणार आहे. निवृत्ती घेतल्यानंतर तो भारताच्या कनिष्ठ हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळणार आहे. दोन दशके भारताच्या मुख्य संघाची सेवा केल्यानंतर आता श्रीजेश देशाच्या भविष्यातील स्टार खेळाडूंना तयार करण्याचे काम करणार आहे.

पीआर श्रीजेशची कारकिर्द
पीआर श्रीजेशने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी एकूण 335 सामने खेळले आहेत. या काळात त्याने दोन ऑलिम्पिक पदकंही जिंकली आहेत. श्रीजेशने 2006 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. त्याला 2008 च्या ज्युनियर आशिया चषकात सर्वोत्कृष्ट गोलकीपरचा पुरस्कार मिळाला होता. तर 2016 मध्ये त्याने भारतीय हॉकी संघाचे नेतृत्वही केले होते.
Exit mobile version