रायगड पोलीस अधीक्षकांचे विशेष सहकार्य

पोलीस पाटलांना मिळणार थकीत प्रवासभत्ता

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष सहकार्याने पोलीस पाटलांचा पाच वर्षांचा थकीत प्रवासभत्ता खात्यात जमा झाल्याने न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने समाधान व्यक्त केले आहे. मागील 9 वर्ष 2012 ते 2021 पर्यंतचा पोलीस पाटिल प्रवास भत्ता देण्यात आला नव्हता. यासाठी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्याकडे पोलीस पाटील संघटनेकडून सतत पाठपुरावा करण्यात येत होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या विषयात जातीने लक्ष टाकून 2016 ते 2021 पर्यंतचा सुधागड तालुक्यातील पाटलांचा प्रवास भत्ता पोलीस पाटिल यांच्या खात्यात जमा केला आहे. न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटिल संघटना राज्यअध्यक्ष पंढरीनाथ पाटील, रायगड जिल्हा अध्यक्ष महादू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीधर शरद गोळे तसेच सुधागड अध्यक्ष अविनाशजी पिंपळे, बारस्कर पाटिल, खजिनदार यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

उर्वरित 2012 प्रवास भत्ता, इतर तालुक्यातील पोलीस पाटलांचाही प्रवास भत्ता रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जमा होणार असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस भत्ता आम्हाला मिळावा यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचे याकामी विशेष सहकार्य लाभले व आम्हाला आमचा पोलीस भत्ता मिळण्यास मदत झाली, त्याबद्दल आम्ही सर्व पोलीस पाटील व संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानतो.

श्रीधर गोळे, न्यु महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटना, जिल्हा उपाध्यक्ष
Exit mobile version