| रोहा | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने यंदा विक्रमी 380 गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीपेक्षा 22 गाड्यांची वाढ करून यावर्षी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान साजरा होणार असून गणेश फेस्टीव्हल स्पेशल गाड्या मात्र 22 ऑगस्टपासूनच मुंबई, पुणे, कोकण, पनवेल, चिपळूणसह विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत. यामध्येच पनवेल-चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याची घोषणाही मध्य रेल्वेने केली आहे. भाविकांना सुलभ व आरामदायक प्रवासाची सुविधा मिळावी हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे थेट मोबाईलवरूनच अनारक्षित डब्यांची तिकिटे काढू शकतात अशी सुविधाही मध्य रेल्वेकडून उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे तिकिटांसाठी आता लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही.






