| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने बसविलेले गतिरोधक अल्पावधीत खराब झाले आहेत. या गतिरोधकावरील डांबर निखळून गेले असून, सातत्याने दुचाकींना अपघात होत आहेत. त्यामुळे हे गतिरोधक नव्याने बनवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक पादचारी आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर सतत होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी डिकसळ येथे गतिरोधक बसविले आहेत. मात्र, त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने तात्पुरत्या स्वरूपात बनविलेल्या या गतिरोधकांवर स्थानिकांनी आक्षेप घेतला होता. त्यावेळी गतिरोधक बनविण्यासाठी वापरलेले डांबर हे नित्कृष्ट दर्जाचे होते. मात्र, बांधकाम विभाग यांच्याकडून त्या खराब झालेल्या गतिरोधकाबाबत कोणतेही कार्यवाही केली नाही. परिणामी त्या गतिरोधकावरुन जाताना दुचाकींचा अपघात होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील सर्व गतिरोधकांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी किशोर गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता राहुल देवांग यांना भेटून केली आहे. तसेच, ही मागणी मान्य न झाल्यास डिकसळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
डिकसळ येथील गतिरोधक धोकादायक
