शेकाप वर्धापन दिनाच्या तयारीला वेग

हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा, ॲड. आस्वाद पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

| माणगाव | प्रतिनिधी |

सालाबादप्रमाणे यावर्षीही शेतकरी कामगार पक्षाचा दि. 2 ऑगस्ट रोजी वर्धापनदिन कार्यक्रम पाली येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी माणगाव तालुक्यातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील यांनी केले. माणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शनिवार, दि. 22 रोजी दुपारी 1.30 वाजता आयोजित कार्यक्रमाच्या पूर्वनियोजन बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत मार्गदर्शन करताना राजिपचे माजी सभापती तथा आरडीसीसी बँकेचे व्हॉइस चेअरमन सुरेश खैरे म्हणाले की, दरवर्षी दि. 2 ऑगस्टला शेकापचा वर्धापनदिन साजरा केला जातो. यावर्षीचा वर्धापनदिन पाली येथे होणार असून, या वर्धापनदिनाला आमदार जयंतभाई पाटील यांच्या आग्रहाखातर छत्रपती संभाजी राजे हे उपस्थित राहणार असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मेळाव्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायती निवडणुकांबाबतीत आपले नेते मार्गदर्शन करणार आहेत. यानिमित्ताने विरोधकांना आपली ताकद दाखवून देऊन इशारा द्यायचा आहे. शेकापला बरोबर घेतल्याशिवाय कोणाचं काही साध्य होणार नाही. आपल्या सर्वांचे नेते आ. जयंत पाटील यांनी चालू अधिवेशनात नैना प्रकल्प, शेतकऱ्यांचे प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडून अधिवेशनात शेकापचा आवाज विरोधकांना दाखवून दिला. आ. जयंत पाटील यांची ताकद अधिक मजबूत करण्यासाठी वर्धापनदिन कार्यक्रमाला माणगाव तालुक्यातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन केले.

प्रास्ताविकात बोलताना माणगाव तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे यांनी सुरुवातीला इर्शाळवाडी दरड दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना माणगाव तालुका शेकापच्यावतीने श्रद्धांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले की, दरवर्षी पक्षातर्फे दि. 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आज आयोजित करण्यात आली आहे. पक्षाच्या या वर्धापनदिन कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक नवं चैतन्य निर्माण होत असते. महाराष्ट्राच्या राजकारणाचा आज चिखल झाला आहे. सकाळी एका पक्षात असणारा नेता, कार्यकर्ता संध्याकाळी दुसऱ्या पक्षात जात आहे. कोणी कुठेही गेला तरी येणारे दिवस शेकापसाठी चांगले आहेत. पक्षाच्या वर्धापनदिन कार्यक्रमास आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूया असे आवाहन त्यांनी केले.

या बैठकीला शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, आरडीसीसी बँकेचे व्हॉइस चेअरमन सुरेश खैरे, प्रदीप नाईक, सचिन जोशी, राजिपचे माजी कृषी सभापती अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, राजिपचे माजी समाजकल्याण सभापती अशोक गायकवाड, कृउबा समिती माणगाव माजी सभापती संजय पंदेरे, तळा तालुका चिटणीस ज्ञानेश्वर भोईर, माणगाव कार्यालयीन चिटणीस राजेश कासारे, स्वप्नील दसवते, गोविंद पवार, भागोजीबुवा डवले, हसनमिया बंदरकर, संजय पाटील, श्री. नांदगावकर, तालुका सहचिटणीस अँड. मुसद्दीक राऊत, दिनेश गुगले, निजाम फोपळूणकर, विलास गोठल, अमोल मोहिते, राजू मुंढे, राकेश पातेरे आदींसह तालुक्यातील शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीच्या सुरुवातीला इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृत पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पालीत सभेचे आयोजन


| पाली/गोमाशी | प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वतयारीनिमित्त महाड, पोलादपूर येथील कार्यकर्त्यांबरोबर विचारविनिमय सभेचे आयोजन शनिवार, दि. 22 रोजी करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी रायगड जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, प्रदीप नाईक, सचिन जोशी, रायगड जिल्हा बँकेचे संचालक एकनाथ गायकवाड, पोलादपूर तालुका चिटणीस वैभव चादे, महाड तालुका चिटणीस गणेश सावंत तसेच दोन्ही तालुक्यांतील सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version