| माणगाव | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (दि.2) साडेदहा वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर भरधाव खासगी बसने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षा चालकाला गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. तर, तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
माणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षा चालक अशोक सोनार (65) हे मुंबई-गोवा महामार्गाने प्रवास करीत होते. त्यावेळी ते रस्ता ओलांडून जात असताना मुंबईकडून महाडकडे जाणाऱ्या बसची त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक लागली. या भीषण अपघात रिक्षाचालक अशोक सोनार यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या रिक्षातून प्रवास करणारे प्रवासी परी सोनार (11), अश्विनी दळवी (30) व साईशा दळवी (4) हे तिघेजण जण जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, बसचालक कालिदास बाबुराव कोकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बेलदार हे करीत आहेत.
भरधाव बसची रिक्षाला धडक; चालकाचा मृत्यू
